शिरूर : भारत देशाला सर्वार्थाने बलशाली करायचे असेल तर जात – धर्म, आर्थिक स्थिती, सामाजिक स्तर न पाहता, कुठलाही भेदभाव न बाळगता आरोग्य आणि शिक्षण मोफत केले पाहिजे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केले.
वन नेशन वन एज्युकेशन प्रणाली राबवून जे शिक्षण श्रीमंतांच्या मुलाला मिळते तेच रस्त्यावरच्या मुलाला देखील मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मंत्रालयातील कार्यसन अधिकारी प्रविण शिशुपाल यांच्या मातुःश्री रंजना विलास शिशुपाल व सासू अलका बाबासाहेब साबळे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात श्री. जानकर बोलत होते. दीपप्रज्ज्वलनाने त्यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावडे, दलितमित्र रमेश गायकवाड, भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, डॉ. हिरामण चोरे, गौतम कदम, नाथा पाचर्णे, संतोष गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.
रस्त्यावरील प्रत्येक मुलाला फ्री शिक्षण मिळाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, असे नमूद करून श्री. जानकर म्हणाले, आरोग्य आणि शिक्षण यावरच देशाची प्रगती, विकास आणि मजबूतीकरण अवलंबून असल्याने राज्यकर्त्यांनी यावर गांभीर्याने विचार करून धोरणे आखावीत. सर्वांना आरोग्याच्या सुविधा सहज व मोफत उपलब्ध झाल्या पाहिजेत. जे शिक्षण श्रीमंतांच्या मुलांना मिळते तेच झोपडीतील गरीबाच्या मुलाला मिळाले पाहिजे. हे झाल्याशिवाय देश विश्वगुरू होणार नाही.
प्रविण शिशुपाल फाऊंडेशन चे अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. प्रवीण गायकवाड यांनी आभार मानले. दरम्यान, या शिबिरांतर्गत झालेल्या रक्तदान शिबिरात ३३ जणांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना थर्मास भेट देण्यात आले. दरम्यान, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनीही शिबिराला भेट दिली.
महाआरोग्य शिबिरात एक हजार पाचशे रूग्णांनी सहभाग नोंदवला. ७५० रूग्णांच्या विविध व्याधींची तपासणी करून निदान करण्यात आले. ४८५ रूग्णांची नेत्रतपासणी करून ३५५ जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ५२ रूग्णांची नोंदणी करण्यात आली असून, १८ रूग्णांची यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
प्रविण शिशुपाल सोशल फाऊंडेशन ने आयोजिलेल्या या शिबिरास रूबी हॉल क्लिनिक, रूबी हॉल रक्तपेढी व डॉ. मनोहर डोळे फाऊंडेशनचे सहकार्य लाभले असल्याची माहिती शिशुपाल फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी दिली.