टाकळी हाजी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रविवारी दि. २६ रोजी वादळी पाऊस व गारपीट झाले असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज घेऊन याबाबत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सामुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडू असे राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी सांगितले. संविदणे ,कवठे येमाई , टाकळी हाजी गावभेट दौरा करीत शेतकऱ्यांना आधार दिला .
शिरूर-आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.शिरूर तालुक्यात दिनांक २६ रोजी सायंकाळी वडनेर,सविंदणे,कवठे येमाई, मलठण,माळवाडी,म्हसे,निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी,साबळेवाडी, शिनगरवाडी,ऊचाळेवस्ती,डोंगरगण तामखरवाडी,या भागात मोठ्या प्रमाणात गारपिट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंब, द्राक्षे कांदा,गहू, ज्वारी,ऊस इतर रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. जगप्रसिद्घ रांजणखळगे परीसरात तर प्रचंड गारांचा थर साचला होता . गेली अनेक वर्षे अशी गारपीट पाहीली नाही अशी प्रतिक्रीया नागरीकांनी व्यक्त केली . येथील पोपटराव हिलाल , रामदास भाकरे, शहाजी सोदक यांच्या द्राक्षे बागेचे मोठे नुकसान झाले . वारांचा वेग ऐवढा होता की द्राक्षे डांडीब आंबा पिकांला पाने सुद्धा राहीली नाहीत . हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी भावनाविवश झाले होते .
तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली.यावेळी भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हॉईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, प्रांत अधिकारी हरीष सुळ ,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, घोडगंगाचे संचालक सोपान भाकरे , संविदणेचे सरपंच शुंभागी पडवळ शेतकरी उपस्थित होते.
यावेळी ना वळसे पाटील यांनी प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.