शिरूर (प्रतिनिधी ) भीमा नदीवरील पारगाव ( दौंड – शिरूर) पुलाखाली मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, पुणे जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने या खूनाचा छडा लावला, या केस मधे कुठलाही ठोस पुरावा नसताना या खूनप्रकरणी दोघांना अत्यंत शिताफीने आरोपीना जेरबंद केल्यांने पोलिसांचे कौतुक होत आहे .
संतोष अप्पासाहेब गाडेकर (रा. टोकवाडी, ता. मंठा, जि. जालना) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या खूनप्रकरणी बापू भिमाजी तरटे (रा. पळवे खुर्द, ता. पारनेर, जि. नगर) व नीलेश माणिक थोरात (रा. मुंगशी, ता. पारनेर, जि. नगर) यांना अटक केली. दि २९ ऑक्टोबरला गाडेकर यांचा मृतदेह भीमानदीपात्रात पारगाव जवळील पुलाखाली आढळला . त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खूना असल्याने शिरूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशनला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, उपनिरीक्षक गणेश जगदाळे तसेच तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे या पथकाने कसून तपास केला.
खून झालेल्या गाडेकर यांची सुरवातीला ओळख न पटल्याने कुठलाही ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे शोध पथकाने, तब्बल आठ दिवस एकाग्र होऊन शिरूर ते चौफुला या मार्गावरील अनेक सीसीटीव्ही फूटेज तपासले. प्रचंड वाहतुक असलेल्या रस्त्यातील असंख्य वाहनांपैकी एक पिकअप संशयास्पदरित्या पूलाजवळ उभी असल्याचे दिसल्याने व पुढे ती सुपे (ता. पारनेर) जि अहमदनगर येथील टोलनाक्याच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस पथकाने त्या परिसरात वेषांतर करून चौकशी केली. काही पोलिसांनी मृतदेहाचे फोटो दाखवून माहिती मिळवली असता, मृताची ओळख पटली व तो सुपे टोल नाक्याजवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामाला होता, अशी माहिती मिळाली. हे हॉटेल बापू तरटे व नीलेश थोरात यांनी चालवायला घेतले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या तरटे व थोरात यांनी पोलिसी खाक्यासमोर गुन्ह्याची कबूली दिली. मृत गाडेकर याने हॉटेल वर काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतली होती. परंतू तो काम करीत नसल्याने व रक्कमही परत करीत नसल्याने त्यास मारहाण केल्याने तो मरण पावला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पिकअप मधून मृतदेह पारगावच्या पूलावर घेऊन गेलो व पूलावरून भीमा नदीपात्रात टाकून दिल्याचे त्यांनी सांगितल्याने त्यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनी दिली. दोघा संशयितांना गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप वाहनासह शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले.अत्यंत अवघड अश्या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केल्याने जनतेमधुन पोलिसांचे कौतुक होत आहे .