टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) शिरूर तालुक्याच्या बेटभागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबूतसह परिसरातील गावांमध्ये पिस्तूलाचा धाक दाखवून, इतर घातक हत्यारे व शस्त्र बाळगून, प्राणघातक हल्ला करीत दहशत निर्माण करणाऱ्या व या दहशतीखाली खंडणी गोळा करणाऱ्या शिरूर तालुक्यातीलच खंडणीखोरांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केले असुन या टोळीकडून नऊ जीवंत काडतूसासह पाच गावठी पिस्टल जप्त करण्यात आले.
या गुन्ह्यात पोलिसांनी अंकुर महादेव पाबळे (वय २६), ज्ञानेश्वर श्रीकांत पाबळे (वय २५, दोघे रा. कावळ पिंपरी), विशाल उर्फ अण्णा शिवाजी माकर (वय २३, रा. ढोकसांगवी), दिलीप रामा आटोळे (वय ४५, रा. दुडेवस्ती, जांबूत) व नीलेश बबन पळसकर (वय ३५, रा. जांबूत) अशी अटक केलेल्या खंडणीखोरांची नावे असून, ते सर्व पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील असून, या टोळीला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तालुक्याच्या बेट भागातील अनेक गावांत शस्त्रांच्या, पिस्तुलाच्या धाकाने त्यांनी दहशत माजवली होती. छोटे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, परप्रांतिय ठेकेदार यांच्याकडून त्यांनी पिस्तुलाच्या धाकाने खंडणी गोळा केल्याच्या तसेच बेदम मारहाण केल्याच्या तक्रारी असून, त्याबाबत पोलिस पथक सखोल चौकशी करीत आहे.
या टोळीतील काहींनी लियाकत नूरइस्लाम मंडल (वय ५४, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) या बांधकाम व्यावसायिकाचे २ सप्टेंबर रोजी काठापूर गावच्या हद्दीत अपहरण केले. तिघा तरूणांनी त्यांना मारहाण करून स्विफ्ट कार मोटारीत बसविले. निर्जन स्थळी नेऊन त्यांच्याजवळील मोबाईल, पाकीट काढुन घेतले. फाकटे परिसरात व्यवसाय करायचा असेल तर आमच्याकडून वाळू घ्यायची व आम्हाला दहा लाख रूपये द्यावे लागतील, असा दम दिला. मात्र, मंडल यांनी नकार देताच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. टोळीतील एकाने त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून एक लाख रूपये लगेच दे नाहीतर तुला खल्लास करतो असा दम दिल्याने मंडल याने मुलाशी संपर्क साधून या टोळीला एक लाख रूपये दिल्यानंतर त्यांना सोडून दिले. मंडल याने शिरूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्याने पोलिसांनी अपहरणकर्त्यांची नावे निष्पन्न करून त्यांच्याविरूद्ध दहशत निर्माण करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी व खंडणी वसूलीप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे बेट भागात मोठी खळबळ उडाली होती .
जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी या प्रकाराची व खंडणीखोरांच्या दहशतीची गंभीर दखल घेत त्यांच्या मुसक्या आवळण्याबाबत व त्यांच्या गैरधंद्यांची समांतर चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व अभिजीत पवार, पोलिस हवालदार तुषार पंदारे, राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, हेमंत विरोळे, धीरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, जी. एन. देशमाने, नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, नीतेश थोरात, अर्जून भालसिंग, रघुनाथ हाळनोर, गणेश देशमुख, राजेंद्र गोपाळे या पथकाने खंडणीखोरांचा ठावठिकाणा शोधून काढला. ते कोरेगाव भीमा येथे येणार असून, तेथून मध्यप्रदेशात पळून जाणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पकडले. आरोपीच्या दहशतीमुळे जांबुत पंचतळे परीसरात व्यवसायिकामधे मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले होते .