टाकळी हाजी : ( प्रतिनिधी ) : राज्यांचे माजी गृहमंत्री व सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा मतदार संघ असलेल्या टाकळी हाजी -कवठे येमाई बेट भागात राजरोसपणे धाबे, हातभट्टया किरकोळ दारुविक्री गावोगाव सुरु असुन, त्यातुन गुंडागर्दी वाढली आहे मात्र खाकीची सलगी अवैध धंद्यावाल्या लोकाशी वाढली असुन सर्वसामान्य माणसासाठी न्यायाची हलगी कधी कडकडणार असा प्रश्न जनते मधुन व्यक्त केला जात आहे .
लक्ष्मीकृपा थांबेल म्हणुन अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असुन, ऐक प्रकारे अवैध धंदे वाढा लक्ष्मी कृपेचा पाऊस पाडा असा अलिखित फतवाच काढला की काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे . शिरूर तालुक्यात बेट भाग हा सधन भाग समजला जातो . या भागात शेतीच्या माध्यमा मधुन अर्थिक समृद्धी आली मात्र अनेक कुंटुबे दारुच्या व्यसनाधिन झाल्याने उदवस्त झाल्यांचे चित्र दिसत आहे . या भागात टाकळी हाजी सह जांबुत ,पिंपरखेड, जांबुत मलठण ,कवठे येमाई ही मोठी गावे आहेत . प्रत्येक मोठ्या गावात पाच ते सात तर लहान गावात दोन तीन अश्या प्रकारे किरकोळ हातभट्टी विक्रीचे अनाधिकृत चोरून दुकाने थाटले आहेत . या टाकळी हाजी चौकी अंतर्गत पश्चिम भागात ७० ते ८० लोक अवैध दारूची विक्री करीत असल्याचे विश्वसनिय सुत्रांकडुन समजले . तसेच टाकळी हाजी, कवठे येमाई ,संविदणे परीसरात नदीच्या कडेला काटेरी झुडपात सुमारे १० ते पंधरा ठिकानी दारु काढण्यांचे काम सुरु असते . मागिल महीन्यात शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्विकारल्या नंतर मोठी कारवाई केली . मात्र स्थानिक खाकीच्या कृपेने हे धंदे पुन्हा सुरु झाले आहेत . या परीसरातुन अनेक गावांना दिवसा ढवळ्या टाकळी हाजी पोलिस चौकी समोरून दारूची वाहतुक केली जात आहे . अनेक ठिकानी गांज्याची विक्री सुरु असल्याचे सुत्राकडुन समजते . तसेच या भागात टाकळी हाजी, जांबुत ,पिंपरखेड, कवठे येमाई, आमदाबाद फाटा , चिंचोली,मलठण, संविदणे परीसरात धाब्यावर सर्रास सर्व प्रकारची दारूची विक्री सुरु असुन सुद्धा लक्ष्मी कृपेमुळे डोळेझाक केली जात असल्या बददल आश्चर्य व्यक्त केले जात आहे . अवैध दारूधंद्या वाल्यांच्या वसुली साठी स्थानिक चौकी, तालुका स्टेशन, उत्पादन शुल्क पासुन वेगवेगळ्या सेलचे सात वेगवेगळे पंटर दरमहा धंद्या वाल्यापासुन प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपये तर एका हातभट्टी विक्रेत्याला २० ते ५० हजार तर धाब्या वाल्या कडुन २० ते ३० हजार रुपया पर्यन्त ची लक्ष्मी कृपा केली जात असल्यांची चर्चा सुरु आहे त्यामुळे खाकीला येथुन दरमहा लाखोची कमाई होत असल्याने कायमस्वरूपी कारवाई केल्यास लक्ष्मीकृपा कायमची थांबेल म्हणुन धडक कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे .
अवैध दारूधंद्यामुळे अनेक तरुण व्यसनाधिन झाले असुन आहे . शालेय मुला मुलीना रस्त्यांने जाताना या दारुड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे .जांबुत परीसरात घडलेला खंडणी अपहरणाचे वारंवार घडत असलेले गुन्हे याचे उगमस्थान हे अवैध धंदेच आहेत . त्यामुळे परीसरात अनेकांचे खुन झाले आहेत . या भागात मोठी कमाई मिळत असल्याने अनेक अधिकारी पोलिस या भागात बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात . अनेक वर्षे चौकीला असलेले पोलिस व अधिकारी यांची बदली करण्याची मागणी जनते मधुन दबक्या आवाजात केली जात आहे . अन्यथा असेच सुरु राहील्यास गुंडगिरी वाढुन अनेकांना जीव गमवावा लागेल .
शिरूरचे उपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत गवारी तसेच नवीन शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप हे सहकार मंत्र्यांच्या मतदार संघाला अवैध धंद्याची लागलेली किड मुळासकट काढणार का या कडे जनतेचे लक्ष लागले आहे .