शिरूर : ( प्रतिनिधी ) ऑगस्ट महिना उगवला तरी शिरूर तालुक्यामध्ये अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण झाली आहे . बाजरी उत्पादक समजल्या जाणाऱ्या तालुक्यात यंदा मात्र सालचंदीची चणचण भासणार आहे .
शिरूर तालुक्यामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बाजरी भुईमूग सोयाबीन अशा विविध पिकाची पेरणी केली जाते ,मात्र यावर्षी ऑगस्ट महीना सुरु झाला तरीसुद्धा वरून राजाने समाधानकारक हजेरीने न लावल्यामुळे पेरणी केलेल्या हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहे . आज ना उद्या पाऊस होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी महागडे सोयाबीन व बाजरीचे बियाणे घेऊन पेरणी केली मात्र तुरळक स्वरूपाच्या सरी वगळता समाधानकारक पाऊस मात्र अद्यापही बरसला नाही .घोड ,कुकडी या नद्या आणि पावसाळ्यात कोरड्या पडल्या होत्या. मात्र धरणातुन पाणी सोडल्यांने काहीसा दिलासा मिळाला आहे .वेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे .पश्चिम भागातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे .शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन घेतले जाते मात्र खरिपाची बाजरी पेरणी न झाल्यामुळे यंदा साल चांदीचा प्रश्नही निर्माण होणार आहे .
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बेट भागात घोड व कुकडी नदीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन घेतले जाते येथील शेतकरी स्वतःपूर्ती बाजरी घरी ठेवून इतर शेकडे बाजारात विकत असतो मात्र यावर्षी बाजरीची पेरणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा बाजरी विकत घ्यावी लागणार आहे .पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मशागत करून ठेवलेले जमिनीमध्ये काय पेरावे हा प्रश्न त्यांना पडला असून रोज पावसाची बळीराजा चातकासारखी वाट पाहत आहे .अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले बी वाया गेल्यामुळे त्यांनाही आर्थिक फटका बसला आहे .