शिरूर (वृत्तसेवा ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर सोमवार दिनांक 22 रोजी शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून जानकर उद्या काय बोलणार याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे .
शिरूर येथील एस टी स्टॅन्ड जवळ शिवसेवा मंडळ सभागृहात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा व माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर ,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सचिन गुरव, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, विनायक रुपनवर, महीला जिल्हा अध्यक्ष सुनिता किरवे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुराडे यांनी दिली .
माजी मंत्री महादेव जानकर व शिरूर तालुका याची नाळ अत्यंत घट्ट जोडलेल्या असून जानकर यांना मानणारा मोठा वर्ग शिरूर तालुक्यामध्ये आहे . यशवंत सेना ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापने पर्यन्त या काळात शिरूर परीसरात वाड्या वस्त्यावर जानकर यांनी मुक्काम केलेले आहेत . त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग वाडी वस्तीवर विखुरलेला आहे . त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जानकर यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे .खूप दिवसानंतर महादेव जानकर शिरूर तालुक्यांच्या राजकीय दौऱ्यावर येत असून सध्या कोणत्याही पक्षाकडुन युतीची अपेक्षा न ठेवता महादेव जानकर स्वबळाचा नारा देत राज्यात व देशात पक्ष संघटना वाढवण्यासाठी पायाला भिंगरी लाऊन फिरत आहेत .त्यामुळे राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्याचा फायदा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीमध्ये पक्षाला नक्कीच मिळेल .
महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांना यूपीएससीच्या शिक्षणासाठी सुविधा निर्माण व्हावी युपीएससी केंद्र व निवास व्यवस्था तसेच पक्ष कार्यालय दिल्ली येथे बांधण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तालुका निहाय लोक वर्गणी गोळा होत आहे . सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर, आयुक्त, एसपी , सचिव व्हावे यासाठीच माझा प्रयत्न असल्याची तळमळ वेळोवेळी महादेव जानकर यांनी बोलून दाखवले आहे . त्यासाठी जानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन निधी संकलन करण्यात येत असुन मोठा प्रतिसाद मिळत असल्यांचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी सांगितले .