आता आपल्या आवडत्या पर्यटन स्थळ पाहणे झाले सोईस्कर
पर्यटन महामंडळाचे महाराष्ट्र दिनापासुन राज्यात ७५ टुर पॅकेज जाहीर
मुंबई (वृत्तसेवा ) : राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ७५ टुर पॅकेज आज पासुन रोजी सुरु केल्याने पर्यटकांना आपल्या आवडत्या पर्यटन स्थळांना भेटी देणे सोईस्कर झाले आहे.
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली व पर्यटनाला नवीन चालना देण्याच्या दृष्टीकोनातून सदर टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे. प्रधान सचिव (पर्यटन) सौरभ विजय, व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे टुर पॅकेज संपूर्ण महाराष्ट्र जाहीर .करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, जणू प्रत्येकासाठी इथे काहीना काही आहेच.
सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात.
अजिंठा व वेरुळच्या लेण्या ह्या सर्वांनाच भूरळ घालतात. कोकणात गणपतीपुळे, तारकर्ली सारखे समुद्र किनारे असंख्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत. विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव, नाशिक मधील मंदिरे, पुण्यातील संस्कृती आकर्षण ठरत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे बघूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यटक निवास (MTDC Resort) व उपहारागृह (Restaurant) उघडले आहेत. यामुळे पर्यटनांसाठी राहण्याची, खाणपाणाची सोय या पर्यटनाच्या मूलभूत सुविधेतून प्राप्त झाल्या आहेत.
पर्यटक आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासातून मनसुक्त भ्रमंती करु शकतात. एमटीडीसी पर्यटक निवासाचे जाळे तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, माथेरान, खारघर एलिफंन्टा, टिटवाळा, माळशेज घाट, भंडारदरा, नाशिक, कार्ला, शिर्डी, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, छत्रपती संभाजी नगर, अजिंठा, वेरुळ, भिमाशंकर, ताडोबा, पेंच, बोधलकसा, नागपूर, चिखदरा इत्यादी ठिकाणी पसरले आहेत.
दि.01 मे 2023 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) 75 टुर पॅकेज सुरु करत आहेत. या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल.
अनुभावत्मक पर्यटन अंतर्गत कोकणातले काताळ शिल्प, विदर्भातले वन्यजीव, भंडारदरा येथील निसर्ग भ्रमंती, गिर्यारोहण, अवकाश निरीक्षण, कांदळवन इत्यादींचा अनुभव घेता येईल. सोबत गाईडची साथ असणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विश्वास आहे की, या टुर पॅकेज मधून पर्यटकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनाला प्रत्येक व्यक्ती जाण्यास उत्सुक राहील.