मंचर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांपैकी महाविकास आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारीत विजय मिळविला आहे .
या बाजार समितीच्या १८ जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना-भाजप युतीने पॅनेल उभा केला होता. मात्र, युतीच्या पॅनेलला दारुण पराभावाचा सामना करावा लागला आहे. या पूर्वी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. पंधरा जागांसाठी निवडणूक लागली होती.
बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरुण हगवणे यांचा पराभव केला आहे. निकम यांच्या बंडखोरी मुळे मंचर बाजार समितीच्या निवडणुकी कडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते . निकम हे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे विश्वास कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांना भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष पद तसेच लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली होती . एक व्यक्ती एक पद असे राष्ट्रवादीत निर्णय झाल्याने नवीन चेहऱ्यांना संधी देत निकम यांचा पत्ता उमेदवारी यादीतुन अखेरच्या क्षणी कापण्यात आला होता . निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा फोटो लाऊन प्रचार केला, त्यांचा फायदा निकम यांना झाल्याची चर्चा आहे .