एक हजार कोटी रुपये खर्चुन शिरूर हवेलीत पोहचणार घरोघरी पाणी – आमदार अशोक पवार
सरदवाडी ( शिरूर ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पहीली पाणी पुरवठा योजना झाली सुरु

शिरूर (वृत्तसेवा ) : शिरूर – हवेली मतदार संघात जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे एक हजार कोटी रूपये खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे चालू असून, या योजनांच्या पूर्णत्वानंतर मतदार संघातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. ही योजना सर्वप्रथम पूर्णत्वास आणण्याचा मान सरदवाडीने मिळविला असून, इतर विकास कामांतून गावचा लौकीक वाढत आहे असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अँन्ड अशोक पवार यांनी केले .
गावोगाव नळयोजनेद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशनअंतर्गत सरदवाडी (ता. शिरूर) येथे जिल्ह्यातील पहिली नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, नळाद्वारे घरात पाणी मिळणार असल्याने नागरीकांची व प्रामुख्याने महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे.
आमदार ॲड. अशोक पवार व शिरूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या उपस्थितीत या, सुमारे चार कोटी २६ लाख रूपये खर्चाच्या महत्वाकांक्षी अशा नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, माजी नगरसेवक संतोष भंडारी यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता पांडुरंग गवळी, सरपंच विलास कर्डीले, उपररपंच कृष्णा घावटे, ग्रामसेवक काकासाहेब मिंड ,सहायक अभियंता रमेश व्हनमाने, कॉन्ट्रॅक्टर महेश आवाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमानात उपस्थित होते .
या वेळी उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल म्हणाले की,कुठलीही चांगली बाब प्राप्त करायची असेल तर योगदान द्यावेच लागते. त्यामुळे विकासाच्या व प्रगतीच्या कामात गावपातळीवर कुठलेही राजकारण न आणता सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व एकजुटीने ही योजना यशस्वी करावी. त्यासाठी असलेले माफक डिपॉझिट व नाममात्र चार्जेस भरताना मागेपुढे पाहू नये. या योजनेतून शुद्ध पाणी मिळणार असल्याने आरोग्य वाढीस लागून आपलेच भविष्य सुखकर होणार आहे.
या पाणीपुरवठा योजनेच्या जलसंचय टाकीसाठी स्वतःची जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल (स्व.) गजाबा विठोबा कर्डिले व (स्व.) मारूती धोंडीबा कर्डिले यांच्या कुटूंबियांचा यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
ब्रिटीश काळापासून सरदवाडीत पाण्याची सोय नव्हती. परंतू आमदार ॲड. पवार यांनी पुढाकार घेत नजीकच असलेल्या रांजणगाव एमआयडीसीतील जलस्तोत्रापासून सरदवाडीसाठी पाणीपुरवठा योजना होण्यास शासनदरबारी पाठपुरावा केला, असे सरदवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास कर्डिले यांनी आवर्जून नमूद केले. हि योजना २७ किलोमीटर लांब असुन,योजनेतून घरोघर नळाद्वारे पाणी देणार असून, नळाला मीटर बसविला जाईल. अंदाजे दोन पैसे लिटरने हे शुद्ध पाणी मिळेल, तसेच त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राहील असे ग्रामविकास अधिकारी काकासाहेब मिंड यांनी सांगितले. माजी उपसरपंच कृष्णा घावटे पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
आमदार साहेब आमच्या भाऊसाहेबांला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दया ….
या वेळी सरपंच विलासराव कर्डीले म्हणाले की, ग्रामसेवक चांगला असला तर ग्राम विकासाला गती मिळते आमचे ग्रामसेवक अगदी ग्रामपंचायत मधे येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रत्येक योजना समजाऊन सांगत सर्वाना एकत्र ठेवत कामाचा चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतात त्यामुळे या पुढे मला पुरस्कार नको पण आमदार साहेब भाऊसाहेबाला आदर्श पुरस्कार दया अशी मागणी केली आमदार अशोक पवार यांनीही ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांच्या कामाचे कौतुक केले .
सरदवाडीत साकारणार उद्योगपती रशिकभाऊच्या नावाने सांस्कृतिक भवन ..