पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दि.२८ एप्रिल रोजी होत असून ही निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची रंगीत तालीम होत आहे.
गेली आठ दिवसांपासून जाहिर सभांच्या माध्यमातून विखे प्रणीत जनसेवा मंडळ व औटी – लंके प्रणीत शेतकरी मंडळाने एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी करीत जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. ही निवडणूक एवढी चुरशीची होईल असे वाटत नव्हते , आजी माजी आमदार औटी व लंके यांचे मनोमिलन व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी या निवडणुकीत घातलेले व्यक्तीगत लक्ष यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. अवघे तीन साडेतीन हजार मतदार असलेली ही निवडणूक एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढीतच होत आहे. गेली पंधरा वर्षांपासून माजी सभापती काशिनाथ दाते, सोन्याबापू भापकर,अरुण ठाणगे, प्रशांत गायकवाड यांनी सभापतीपदाच्या कारकिर्दीत या बाजार समीतीला नावलौकिक मिळवून दिला आहे.
आमदार नीलेश लंके,माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे , जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन कै. ॲड.उदयदादा शेळके यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली या बाजार समीतीची सत्ता कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना या पक्षाकडे होती. सभापती प्रशांत गायकवाड यांनी मात्र सोशल मिडिया माध्यमातून गेली तीन ते चार वर्षांत बाजार समिती माध्यमातून होणारे उपक्रम व बाजारभाव सातत्याने प्रसिद्ध करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने करीत प्रसिद्धी तंत्र अवलंबीत कार्यरत राहण्याचे काम केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी ही निवडणूक तिरंगी होईल असे वाटत असतानाच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चित्र पालटले आणी आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची घोषना करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसेच स्टार उमेदवार देउन आम्ही किती सक्षम उमेदवार दिलेत हे दाखवून दिले असले तरी या स्टार उमेदवारांची खरी कसोटी दि.२८ लाच होणार असून तेच तेच चेहरे मतदार निवडून देतात की त्यांना कायमचे घरी बसवतात हे पहाणे महत्वाचे आहे.
विखे प्रणीत जनसेवा मंडळाने मात्र त्या त्या परिसरातील चार दोन गावांत माहिती असणाऱ्या तसेच ग्रामीण भागाचे शहाणपणाचे राजकारणाची माहिती असणाऱ्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊन चांगलाच शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत माजी आमदार विजय औटी व आमदार नीलेश लंके प्रणित शेतकरी मंडळाने बाह्य शक्तीचा या निवडणुकीतील हस्तक्षेप हा मुद्दा अधोरेखित केला असून विखे हटाव तालुका बचाव हीच मोहिम हाती घेतल्याचे दिसत असून औटी व लंके यांनी जोरदार भाषनबाजी करीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या वर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यातच आळकुटी येथील त्यांच्या सांगता सभेत माजी सभापती राहुल झावरे यांनी खासदार डॉ विखे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्यावर जोरदार टीका करीत शेवटी शेवटी या निवडणुकीतील रंगत आणखी वाढवून आपण आगामी जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवीणार असल्याचे संकेत देउन विखे पाटील यांना जाहीर आव्हान दिले आहे. खासदार विखे प्रणीत जनसेवा मंडळाकडून तालुक्यातील वाढलेली गुंडा गर्दी, अवैध धंदे,वाळु उपसा, बाजार समितीतील जमीन खरेदी विक्रीचा गफला, राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आजी माजी आमदारांचे मनोमिलन हेच मुद्दे जाहिर सभेत मांडत राज्यात व केंद्रात सत्ता आमचीच असल्याने आम्ही बाजार समीतीसाठी मोठ्या योजना आणून शेतकरी विकास करु शकतो हेच प्रभावी मुद्दे अधोरेखित करीत जनतेचे लक्ष वेधले आहे. विषेश म्हणजे दोन्ही मंडळाच्या जाहिर सभांना मोठा प्रतिसाद मिळाल्याने निवडणुकीचा निकाल संमिश्र लागेल अशी शक्यता निर्माण झाली असून १०/ ८ अशाप्रकारे काठावर बहुमत मिळून दोन्ही पैकी कोनते मंडळ सत्ताधारी होईल याची आज तरी खात्री देता येणे शक्य वाटत नाही. कारण दोन्ही मंडळातील बहुसंख्य उमेदवार आपल्याकडे लक्ष द्या अशीच विनंती मतदारांना करीत असल्याने क्रॉस मतदानाची शक्यता मोठ्या प्रमाणात गृहीत स्टार उमेदवार पडतात की नव्यांना संधी मिळणार हे चित्र मतदार राजा कशाप्रकारे रंगवीतो यावरच अवलंबून आहे. मात्र निकाल काही लागो. महाविकास आघाडी जी बाजार समीती निवडणूकीसाठी एकत्र आली आहे ती यापुढे सुद्धा टिकणार. जिल्हा परिषद, पंचायत समिती, व आगामी प्रतेक निवडणुकीत हे एकत्र झालेले आजी माजी आमदार एकत्र राहुणच निवडणूक लढविणार हे मात्र यातून स्पष्ट होत आहे.केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून तशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठी पारनेरचे कार्यसम्राट आमदार आणी आपल्या समाजसेवी वृत्तीचा बाणा प्रभावीत करुण राज्यात नावलौकिक मिळवलेल्या नीलेश लंके यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित केले असून तशी तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. लंके यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास तसेच महाविकास आघाडी पारनेरची विधानसभा उमेदवारी आपल्यालाच देईल अशी घटक पक्षातील अपेक्षीत उमेदवाराला खात्री असल्याने ही महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढेल असा अंदाज राजकीय समीक्षक व्यक्त करीत आहेत. तसेच विखेंचा हस्तक्षेप तालुक्यातून कायमचा हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडी तालुक्यात प्रबळ करण्याचा लंके- औटी यांचा उद्देश लपून राहिलेला नाही जेणेकरून लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी आमदार लंके यांना आणखीन सोपे जाईल. जेणेकरून ईतर तालुक्यात सुद्धा विखे यांच्यासारखी शक्ती आम्ही हद्दपार केली आहे. हा राजकीय संदेश लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसाठी बळ देणारा ठरु शकतो.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जुलै महिन्यात होते की डिसेंबर २३ पर्यंत होते याचा काही अंदाज लागत नाही. कारण राज्य सरकारमध्ये पुन्हा सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सध्या अजितदादा पवार, नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत असल्याने कदाचीत मुख्यमंत्री पद जर एकनाथ शिंदे यांचे गेले तर नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका पुन्हा सहा महिने पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जरी पुढे गेली तरी पारनेर तालुक्यातील बाजार समिती निवडणुकीत आगामी निवडणुकीची रंगीत तालीम पहावयास मिळत असल्याने संकेत दिसू लागले आहेत. ही निवडणूक लढवीत असताना दोन्ही मंडळाच्या नेत्यांनी, उमेदवारांशी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदार व त्यांच्या समर्थकांशी व्यक्तीगत संपर्क केला असून जाहिर सभा,घोंगडी सभा व वाडी वस्तीवर जाउन मंडळाची भुमिका, शेतकरी हित सांगत व्यक्तीगत संपर्क अभियान राबवल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक सोपी होण्यासाठी निवडणुकीतील बारकावे हेरुण घेतले आहेत.
पारनेर तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र आल्याने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होणार आहे. निघोज – आळकुटी जिल्हा परिषद गटाचेच उदाहरण द्यायचे झाल्यास या गटात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.या निवडणुकीसाठी कवाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून मार्च महिन्यात निघोज येथील कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आणून कवाद यांचे लॉन्चिंग मोठ्या प्रमाणात केले आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी विखे पाटील यांचे कट्टर समर्थक माजी पंचायत समिती सदस्य डॉ भास्करराव शिरोळे यांना शिवसेनेने जाहीर केली आहे. गेली आठ ते नऊ महिन्यापुर्वी डॉ शिरोळे यांनी विखेंशी काडीमोड करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. डॉ शिरोळे व कवाद यांचे संपर्क अभियान सध्या सातत्याने सुरू असल्याने या दोघांनीही जिल्हा परिषद निवडणूक लढवीण्याची इच्छा स्पष्ट झाली आहे. मात्र यामध्ये महाविकास आघाडीचे नेते उमेदवारी कुणाची कट करतात हे आत्तापासूनच कार्यकर्ते चर्चा करीत आहेत.अशाप्रकारे पंचायत समिती निवडणुकीसाठी सुद्धा शिवसेना व राष्ट्रवादी कडून बहुसंख्य उमेदवार इच्छुक असून कुणाला थांबवणार व कुणाला उमेदवारी देणार ही महाविकास आघाडी पक्षश्रेष्ठींना डोकेदुखी होणार असून कार्यकर्ते मात्र आपलीच उमेदवारी पक्की करण्यासाठी बाजार समिती निवडणुकीत जिवाच रान करीत असून बाजार समिती निवडणुक ही आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम आहे हे मात्र नक्की.
माजी आमदार विजय औटी व आमदार नीलेश लंके यांचे मनोमिलन झाल्याने औटी यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे व माजी सभापती गणेश शेळके यांनी उघड भूमिका घेऊन विखे प्रणीत जनसेवा मंडळाला पाठींबा दिला आहे. तांबे व शेळके यांचे तालुक्यातील बहुसंख्य भागावर वर्चस्व व मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने त्यांचा फायदा जनसेवा मंडळाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते हे शेतकरी मंडळाच्या प्रचारात सक्रिय नाहीत. मात्र त्यांची भुमिका गुलदस्त्यात आहे. दाते हे सक्रीय होतील अशी शक्यता कमी आहे मात्र त्यांच्या तटस्थेचा फायदा मात्र विखे पाटील प्रणीत जनसेवा मंडळाला होईल याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडी झाली खरी मात्र जर काय बाजार समीतीची सत्ता हातून गेली तर याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होईल. विखेंचे वर्चस्व जिल्ह्यातच काय मात्र राज्यात आहे. विखे यांची शक्ती आणी प्रवरा पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध आहे. बाजार समीतीची सत्ता विखे यांना मिळाल्यास विखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देउन पुन्हा एकदा माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या सारखे प्रभुत्व खासदार डॉ सुजय विखे पाटील निर्माण करतील आणी पारनेरच्या राजकारणावर विखे कुटुंबाचे एकहाती वर्चस्व निर्माण होईल.