पुणेपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उपस्थित ११ जणांचा मृत्यू, २४ श्रीसदस्यांवर रुग्णालयात उपचार
केंद्रीय गृहमंत्र्याच्या हस्ते झाला खारघर मधे कार्यक्रम
शेकडो लोकांना उष्णतेचा फटका
नवी मुंबई (वृत्तसेवा ) :
नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी (ता. १६) आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदानाच्या सोहळ्यात ११ श्रीसदस्यांचा मृत्यू ओढवला असून ५० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यापैकी २४ श्रीसदस्यांंवर उपचार सुरू आहेत. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती आहे. वर्ष २०२२ चा राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार रेवदंडा येथील श्री समुदायाचे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती. सकाळी १०.३० वाजेचा कार्यक्रम होता. मात्र तो दुपारी एक वाजेपर्यंत चालला. ३८ अंश सेल्सियस तापमानात त्यानंतर तीन तास सेवकांना आपल्या गाड्यापर्यंत पोहोचता आले नाही. परिणामी अनेकांना उन्हाचा त्रास झाला.
खारघरचे सर्व रस्ते मोटारगाड्यांनी अडवल्याने रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचता आले नाही. परिणामी, ११ श्री सेवकांना आपला जीव गमवावा लागला. कार्यक्रम पत्रिकेत वेळ सकाळी १०.३० वाजताची होती. मात्र सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, सचिन धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमीत शहा आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भाषणे झाली. सूत्र संयोजकांनी मोठा वेळ घेतला. परिणामी हा कार्यक्रम तब्बल १ वाजता संपला. सेवकांना कार्यक्रम स्थळातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागले. परिणामी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ७ लाख लोक उन्हात होते. दोन दिवस खारघरचे सर्व मुख्य रस्ते बंद आहेत. शाळा व कार्यालयांना सुट्ट आहे. स्थानिक रिक्षा, परिवहन वाहतूक सर्व बंद होती. २५० टॅंकर आणि २ हजार नळ, ६९ रुग्णावाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स कार्यरत होते. प्रशासनाला वेठीस धरुन हा कार्यक्रम झाला.
मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर –
२४ श्रीसदस्य कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय तसेच कळंबोली, खारघर आणि नवी मुंबईच्या रुग्णालयात अनेक रुग्णांवर उपचार चालू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामोठे रुग्णालयात जाऊन रुग्णांची माहिती घेतली. मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. सरकारने सर्व माहिती लपवली असून रुग्णालयात पत्रकारांना जाण्यास मज्जाव होता. पनवेल रुग्णालय हे नोडल म्हणून नेमण्यात आले. परंतु तेथे काही माहिती दिली जात नव्हती.
कार्यक्रमात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींची एमजीएम रुग्णालयात स्वत: जाऊन चौकशी केली असून त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्यात येणार आहे. -एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मनुष्यवधाचा गुन्हा लावा – आजचा महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा भरउन्हात ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लाेकांचा बळी गेला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाेंदवावा. -अतुल लाेंढे, काँग्रेस प्रवक्ता
मुख्यमंत्र्यांचा हट्ट
मुख्यमंत्री शिंदे स्वत: रेवदंड्याच्या श्री समुदाय परिवारातील आहेत. त्यामुळे जंगी कार्यक्रम त्यांना करायचा होता. तसेच गृहमंत्र्यांसमोर आपण २० लाख लोक जमवू शकतो, अशी शेखी मिरवायची होती. त्यामुळे दुपारी आणि प्रशासनाला वेठीस धरून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक विभागाचा भपकेबाजीस विरोध
सांस्कृतिक विभागाने या भपकेबाज कार्यक्रमाचे नियोजन करण्यास हरकत घेतली होती. त्यानंतर त्याचे नियोजन मुख्यमंत्री शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिन जाेशी यांच्याकडे देण्यात आली.१५० एकरात हा कार्यक्रम झाला .