लोणी काळभोर (वृत्तसेवा ): पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात उसाला पाणी देत असताना एका तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैर्वी घटना घडली आहे. या शेतकऱ्याचे फक्त दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अंगावरची हळद देखील निघाली नाही तर ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने लोणी काळभोर परिसर एकच खळबळ उडाली आहे.
दीपक दशरथ काळभोर ( वय २९) असे वीज पडुन मृत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. उसाला पाणी भरत असताना ही घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक काळभोर हा लोणी काळभोर परिसरातराहत आहे. त्यांचे शेत तिथेच आहे. शेतामध्ये ऊस लावलेला असल्याने तो शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाचे वातावरण झाल्याने आकाशात विजा चमकत होत्या. मात्र दीपक उसाला पाणी देत असताना अचानकपणे वीज त्याच्या अंगावर पडली आणि त्याचा त्यात मृत्यू झाला. बराच वेळ झाला मुलगा शेतातून घरी आला नाही म्हणून घराच्या लोकांनी शेतात जाऊन पाहणी केली तर दीपक त्यांना जमिनीवर पडल्याचे आढळून आले. घरच्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
दिपकचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याचा संसार अजून फुलतच होता. अंगावरची हळद देखील अजून नीट निघालेली नव्हती. त्यातच अशी घटना घडल्याने त्याच्या पत्नीला धक्का बसला असून कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपकचा स्वभाव मनमिळावू होता. सर्वांशी त्याचे वागणे ,.बोलणे आपलेपणाने होते. त्याचा मित्र परिवारही मोठा. त्याच्या आचानक जाण्याने मित्र परिवारात दुःखाचे वातावरण आहे.