पुणे : ( वृत्तसेवा ) : इंधन घेऊन शिर्डी विमानतळाकडे निघालेल्या लोणी काळभोर येथील इंधन कंपनीच्या टँकर मधून इंधन चोरी करणाऱ्या चोरांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यात २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा एकूण दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हडपसर परिसरातील हडपसरजवळील १५ नंबरमधील लक्ष्मी कॉलनीत थांबले असून त्यातून पेट्रोल काढले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सुनिलकुमार प्राणनाथ यादव (वय २४ रा. हडपसर, मूळ रा. प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश), दाजीराम लक्ष्मण काळेल (वय ३७ मूळ रा. वळई ता. माण, सातारा ), सचिन रामदास तांबे (वय ४० रा. हडपसर), शास्त्री कवलु सरोज (वय ४८ रा.हडपसर), सुनिल रामदास तांबे (वय ३८ रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हडपसर पोलिसांनी लोणी काळभोर हद्दीत ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हडपसर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस कर्मचारी मनोज सुरवसे यांना इंधन चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली. नवी मुंबईतील वाशी येथून एटीफ पेट्रोल (विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल) तसेच डिझेल भरून टँकर शिर्डी विमानतळाकडे निघाले होते. तसेच इंधन कंपनीकडून प्रवासाचा मार्ग निश्चितही करण्यात आला होता, तसेच टँकरमध्ये विशिष्ट यंत्रणा बसविण्यात आली होती.
मात्र इंधन चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी हा सर्व बनाव सापळा रचून येथे छापा टाकून उघडकीस आणला. यावेळी आरोपी टँकरमधून इंधन चोरी करत असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून पोलिसांनी तेथून इंधन भरलेले दोन टँकर, आठ रिकामे टँकर, १४ प्लास्टिक कॅन असा दोन कोटी २८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या घटनेची माहिती इंधन कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. इंधन कंपनीतील अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामुळे पेट्रोल चोरी करणारी टोळी रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.
खरा मास्टर माइंड कोण
या तस्करीचा खरा मास्टर माइंड पर्यन्त पोलिस पोहचुन इंधन तस्करी भेसळ यांचे पाळेमुळे खोदून काढतील का असा प्रश्न जनते मधुन विचारला जात आहे .