पुणेमहाराष्ट्रराजकारण

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (वृत्तसेवा ) : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन
मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page